पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक करणाऱ्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंगल्यातील अनेक महागड्या वस्तू लंपास केल्या आहेत. विशेष म्हणजे हा बंगला ईडीच्या ताब्यात होता.
डी. एस. कुलकर्णी यांनी हजारो गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर, ईडीने कारवाई करत हा बंगला ताब्यात घेतला होता. तेव्हापासून हा बंगला बंदच होता. दरम्यान, चोरट्यांनी या बंद बंगल्यावर डल्ला मारून बंगलातील महागड्या वस्तू लंपास केला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.
डी. एस कुलकर्णी यांनी पुण्यातील चतु:श्रृंगी मंदिराजवळ २००६ साली एक भव्यदिव्य ४० हजार चौरस फुट बांधकाम असलेला सप्तश्रृंगी नावाचा बंगला बांधला होता. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्ट्येपूर्ण होता. पण डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, ED ने कारवाई करत डीएसके यांचा हा आलिशान बंगला आपल्या ताब्यात घेतला होता.
त्यानंतर मागील काही वर्षांपासून हा बंगला बंदच होता. १६ ऑक्टोबर २०१९ ते ११ ऑक्टोबर २०२१ दरम्यान या बंगल्यात चोरी करण्यात आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचं लॉक आणि सिल तोडून बंगल्यामधील ६ लाख ९५ हजार असा जवळपास ७ लाखांचा ऐवज लुटला आहे. यामध्ये बंगल्यातील ८ एल ई डी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी अशा महागड्या वस्तू चोरून नेल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. बंगल्यात चोरी झाल्याचा संशय आल्याने फिर्यादी भाग्यश्री कुलकर्णी यांनी ईडीचे अधिकारी, पोलीस आणि पंच यांच्या समक्ष बंगल्यात जाऊन पाहणी केली आहे. त्यानंतर चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.






