नाशिक (विशेष प्रतिनिधी) : निफाड तालुक्यातील चांदोरी येथील एका लॉन्समध्ये बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच, उत्पादन शुल्क विभागाने सायखेड्यातही कारवाई करीत ५० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, कारवाई झालेले दोन्हीही कारखाने हे संजय दाते यांचे असून, ग्रामीण पोलिसांनी त्यांना चांदोरीतील कारवाईत ताब्यात घेतले आहे.
निफाड तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद राज्यमार्गावर असलेल्या चांदोरी शिवारात उदयराजे लॉन्समध्ये अवैधरीत्या सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. सोमवारी (दि. ११) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सुमारे एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता.
या कारवाईनंतर लगेचच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक मनोहर अंजुळे यांना मिळालेल्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सायखेड्यात छापा टाकला. दरम्यान, धुळ्यातील गुन्हेगार दिनेश गायकवाड ऊर्फ दिनू डॉन हा बनावट दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचं पुढे आले आहे. त्याच्यावर ह्यमोक्काह्णअंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई झालेली आहे.






