बुधवारच्या वादळानंतर बेलापूर परिसरात परिस्थिती पूर्वपदाकडे

महानगपालिका, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे परिश्रम

बेलापूर(सि.बी.डी) (महेश खैरनार) – बुधवारी (दि 5 ) झालेल्या वादळादरम्यान प्रभागात व सिबीडी बेलापूर विभागात विविध ठिकाणी झाड़े वारा-पावसा मुळे पडल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. यावर त्वरित कारवाई करत महानगरपालिका अधिकारी श्री.तायडे, पूनम चासकर व त्यांचे सहकारी तसेच अग्निशामक दलाचे श्री.अधरवाड, अरुण भोईर व त्यांचे सहकारी यांनी त्वरीत घटनास्थळी येऊन कामास सुरवात केली . काही ठिकाणी पाण्याच्या लाईन तुटल्या त्या ठिकाणी श्री.काळभोर व श्री. झाजी हयांनी भेट देऊन कामास प्राधान्य देत काम पूर्ण केले . या सर्व अधिकाऱ्यांचे परिसरातील राहिवाशांनी तात्काळ कार्यवाही करुन मार्ग सुरळीत केल्याबद्दल धन्यवाद दिले आहेत.
दरम्यान ठाणे-बेलापूर रस्त्यावरून नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पोवर शुक्रवारी काल (दि.७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गुलमोहराचे झाड कोसळल्याने हा मार्ग बंद झाला होता. कळवा नाक्यावरून विटाव्याच्या दिशेने जात असताना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या समोरील बाजूस हा प्रकार घडला. सुमारे दीड तास आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून हे झाड हटवले. त्यानंतर हा मार्ग मोकळा झाला. परंतु त्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यामुळे वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. या भागात सुरू असलेल्या कामांमुळे हा मार्ग अरूंद झाला असून झाड पडल्याने संपूर्ण परिसर कोंडीत अडकला होता.
ठाणे-बेलापूर रस्त्यावर कळवा नाक्याच्या परिसरात खाडी पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून यामुळे या भागात सातत्याने वाहतूककोंडी होत असते. शुक्रवारी सकाळी वाहतूक सुरू असताना अचानक रस्त्यालगतचे झाड एका टेंम्पोवर कोसळले. धनराज नखातीलक हा चालक यावेळी ट्रक चालवत होता. तो या अपघातातून बचावला आहे. झाड हटवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी सुमारे दीड तासाच्या परिश्रमाने हे झाड कापून बाजूला काढले. परंतु तोपर्यंत नवी मुंबईकडे जाणारी मार्गिका पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे परिसरात कोंडी झाली. संपूर्ण परिसरातील रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता मोकळा झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्यास सुरुवात झाली. गुलमोहराचे हे झाड अचानक कोसळल्याने हा अपघात घडला असून कोणासही गंभीर दुखापत नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here