जळगाव जिल्ह्यातील ऐनपूर येथे दसऱ्याच्‍या दिवशीच सिलेंडरचा स्‍फोटाने घराची राख

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : दसरा सण सगळीकडे मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत आहे. अशातच जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील ऐनपुर येथे घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने, संपुर्ण घराची राखरांगोळी झाली आहे. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही. मात्र ऐन दसऱ्याच्या दिवशीच बारी कुटूंब उघड्यावर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुशिलाबाई जगन्‍नाथ बारी (वय ६६) या ऐनपुर येथील बारी घाट परिसरात राहतात. मोलमजुरी करणाऱ्या महिला आपला मुलगा, सून आणि दोन नातवंडांसह राहतात. आज सकाळी साडेसातच्या सुमारास गॅसवर चहा करत असताना अचानक गॅसच्या नळीने पेट घेतला. गॅसचा भडका होताच घरातील सर्वजण घाबरून घराबाहेर पळाले.

आगीने रौद्र रूप धारण केले आणि नंतर झालेल्या स्फोटात पत्र्याचे घर आणि घरातील सर्व सामान अक्षरश: उध्वस्त झाले . हा स्फोट इतका भयानक होता की, गॅस सिलेंडरचे दोन तुकडे झाले. या घराच्या विटांचे आणि मातीचे तुकडे शंभर- दोनशे मीटर अंतरावर जाऊन पडले आणि घरावरील पत्रे, लोखंडी कपाट, संसारोपयोगी साहित्य आगीत जळून नष्ट झाले.

बारी परिवार अतिशय गरीब असून मोलमजुरी करणारा आहे. सुशीलाबाईचा मुलगाही भाजी विक्री करुन आपला उदरनिर्वाह चालवतो. आता ऐन दसऱ्याच्या दिवशी घरात पिण्यासाठीही पाणी नाही. घरातील संसारोपयोगी सामान लोखंडी कपाट अंथरूण-पांघरूण सर्व जळून नष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here