घोडबंदर रोडवर कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटला

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : येथील घोडबंदर रोडवर गायमुखजवळ २५ टन कच्च्या धाग्याची वाहतूक करणारा ट्रेलर उलटल्याची घटना रविवारी रात्री घडली. सुदैवाने, यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. ट्रेलर उलटल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.



सुरत (गुजरात) येथून न्हावा शेवा, नवी मुंबईकडे हा ट्रेलर २५ टन कच्चा लूम मटेरियल घेऊन जात होता. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घोडबंदर मार्गावरील गायमुखजवळ चालक तस्सुवर खान यांचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रेलर रस्त्यावरुन अचानक उलटला. त्यामुळे ट्रेलरच्या टाकीतील ऑईल घोडबंदर ते ठाणे मार्गावरील रस्त्यावर सांडले. हा अपघात गायमुख जकात नाक्याजवळील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक ९७ समोर घडला.



या अपघातात रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कक्षासह कासारवडवली वाहतूक नियंत्रण शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. या अपघातातून चालक खान हे सुदैवाने बचावल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here