मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : गिर्यारोहकासोबत ट्रेकिंगसाठी गेलेल्या आयएएस अधिकारी मनीषा पाटणकर-म्हैसकर यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात त्यांनी स्व:ता फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे. म्हैसकर यांच्यासह मधमाशांनी त्यांच्या काही साथीदारांवर सुद्धा हल्ला केला आहे.
गिर्यारोहक मिलिंद यांना अनेक मधमाशांनी दंश केला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे व ते औषधोपचार घेत आहेत. या घटनेता थरारक अनुभव आयएएस ऑफिसर मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी स्वत: फेसबुक पोस्टद्वारे सांगितला आहे.
https://www.facebook.com/manisha.mhaiskar.52/posts/1239054316603892
महिला अधिकारी पाटणकर-म्हैसकर या काल आपल्या काही साथीदारांसोबत ट्रेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळी गिर्यारोहक मिलिंद हे सर्वात पुढे चालत होते, तर पाटणकर-म्हैसकर या मिलिंद यांच्या मागे काही अंतरावर चालत होत्या. दरम्यान, अचानक मिलिंद मागे वळाले आणि त्यांनी ओरडत मनीषा यांना पळण्यास सांगितले.
मात्र मिलिंदवर मधमाशांनी जोरदार हल्ला केला होता. यावेळी मनीषा यांनी आपल्याकडील स्टोल मिलिंदच्या दिशेने फेकला. मिलिद स्टोल पांघरून खाली बसला. पण शेकडो माशा त्याच्याभोवती घोंघावत होत्या. तर काही माशा अजूनही मिलिंदला दंश करत होत्या. तर काही माशा मनीषा यांच्या दिशेने दंश करण्यासाठी आल्या. दरम्यान तेथील काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्यांच्याजवळील कोट आणि शॉल मनीषा यांना दिली. यामुळे त्या मधमाशांच्या तावडीतून थोडक्यात बचावल्या आहेत.
यानंतर येथील काही स्थानिक नागरिकांनी धूर करून मधमाशांना पळवून लावलं. पण मिलिंद याला अनेक मधमाशांनी दंश केला आहे. या घटनेनंतर मिलिंद यांना मधमाशांनी केलेल्या दंशचे काटे काढण्यात आले आहे. सध्या मिलिंद यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.






