पाचोरा (प्रतिनिधी) : तालुक्यातील लासगाव येथे पत्नीस पाण्याची तहाण लागल्याने विहिरीत पाणी काढण्यासाठी गेलेल्या पतीचा पाय घसरुन विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली
याबाबत असे कि, पत्नीला पाण्याची तहान लागल्याने कैलास सखाराम महाजन हे विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले. मात्र सद्यस्थितीत सुरु असलेल्या पावसामुळे व विहीर कच्ची असल्याने कैलास महाजन यांचा पाय घसरून ते विहीरीत पडले. विहीरीत २० ते २५ फुट पाणी असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
त्यांच्या पत्नीस विहीरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी गावातील नागरिकांना मोबाईलवरुन माहिती दिली. मात्र गावातील नागरिक घटनास्थळी पोहचेपर्यंत कैलास यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले. त्यांचे पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी व तीन मुली आहेत.






