नागपूर (उपसंपादक उमेश अबनलकर) : पोलिसांच्या तावडीतून फरार होताना रेल्वेखाली येऊन आरोपीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ११.२१ वाजताच्या सुमारास मौदा पोलीस स्टेशन अंतर्गत नवेगाव परिसरात घडली. रोशन गुरूबक्ष सचदेव (वय ४० रा. भानूप्रतापपूर, जि. कांकेर, छत्तीसगड), असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून महिन्यात भानूप्रतापपूर पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग व अॅट्रॉसिटीअंतर्गत रोशनविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्यात तो फरार होता. छत्तीसगड पोलीस त्याचा शोध घेत होते. रोशन हा मुंबईला असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली. चार पोलिसांचे पथक मुंबईला गेले. दरम्यान तो मुंबईहूनही फरार झाला. रोशन हा त्र्यंबकेश्वर येथे असल्याचे पोलिसांना कळाले. छत्तीसगड पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने रोशन याला त्र्यंकबेश्वरमध्ये पकडले.
‘ लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्स्प्रेस ‘ने त्याला घेऊन पोलीस छत्तीसगडकडे निघाले. सोमवारी सकाळी उलटी आल्याचा बहाणा रोशनने केला. एक पोलीस कर्मचारी त्याला शौचालयात घेऊन जात होता. याचवेळी पोलिसाच्या हाताला हिसका देत रोशनने रेल्वेतून उडी घेतली. त्यावेळी रेल्वेच्या चाकाखाली चिरडून त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मौदा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.