मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे नवी जबाबदारी आली आहे. चाकणकर यांची अखेर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. दरम्यान, चाकणकर या आज या पदाची सूत्रे स्वीकारणार असून राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना पाहता त्यांच्यापुढे मोठे आव्हान असणार आहे.
विजया रहाटकर यांनी ४ फेब्रुवारी २०२० रोजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गेल्या दीड वर्षापासून हे पद रिक्त होते. दरम्यान, मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार व हत्येची घटना तसेच महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने हे पद भरण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्याचवेळी राष्ट्रीय महिला आयोगानेही हे पद रिक्त असल्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर तातडीने महिला आयोगाला नवं नेतृत्व देण्यात आलं आहे.
राष्ट्रवादीतून रुपाली चाकणकर यांचे नाव या पदासाठी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळ वाटपात हे पद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार हे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीतून चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. त्यानंतर याबाबत पुढील प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली असून आजच चाकणकर यांच्या नियुक्तीची अधिसूचना काढण्यात आली आहे. ही नियुक्ती पुढील तीन वर्षांसाठी असणार आहे, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.






