मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीदरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. खडसे यांना एक आठवडा अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. हा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.
खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण, त्यांचा अर्ज सुनावणीदरम्यान फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. यासंदर्भात अंजली दमानिया यांनीच तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथराव खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला होता. त्यांच्याबाबत पुढील सुनावणी आज झाली. या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.
काही दिवसांपूर्वी एकनाथराव खडसे यांची पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथराव खडसे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. पण या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकनाथराव खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.






