नाशिक (विशेष प्रतिनिधी) : मागील दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात आयकर विभागाने १० ते १५ कांदा व्यापाऱ्यांच्या मालमत्तेची झडती घेतली. या कारवाईदरम्यान आयकर विभागाने तब्बल २५ कोटी रुपयांची रोकड हस्तगत केली असून, अद्याप तपास पूर्ण झालेला नसल्याचे सांगण्यात आले.
देशातील कांद्याची मोठी बाजार पेठ म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिक मध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. यात कांदा आणि द्राक्ष पिकांचा सर्वात मोठा वाटा असतो. देशभरात येथून मालाचा पुरवठा होतो. यामुळे व्यापारीही येथे मोठ्या संख्येने आहेत. मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने केलेली कारवाई महत्त्वाची ठरते.
आयकर चुकवलेल्या व्यापाऱ्यांमध्ये कांदा आणि काही द्राक्ष व्यापाऱ्यांचा समावेश आहे. बहुतांश व्यापारी पिंपळगाव बसवंत येथील असून, दोन व्यापारी नाशिक मधील आहेत. सदर व्यापाऱ्यांनी एकूण शंभर कोटी रुपयांचा आयकर चुकवल्याचा आयकर कार्यालयाचा अंदाज असून, त्यातील २५ कोटी रुपये जप्त करून ही रक्कम ‘ स्टेट बँक ऑफ इंडिया ‘च्या शाखेत जमा करण्यात आली आहे. दरम्यान, आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कांदा व्यापऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आगामी काळात आयकर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या आणि पैसा वाढतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






