ओळख लपवून हिंदू नावाने लग्न करणार्‍या मुस्लिम व्यक्तीला अटक

होजाई (आसाम) : जिल्ह्यातील एका गावातून स्वतःची ओळख लपवण्यासाठी हिंदू नाव धारण करून विवाह करणार्‍या मुस्लिम व्यक्तीला त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने दिली.

होजाईतील जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या मदतीने पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती लुमडिंगचे प्रभारी ठाणेदार एस. के. शर्मा यांनी दिली. तामिळनाडूतील कार्यालयात कार्यरत असताना ही महिला त्याच्या संपर्कात आली होती. ती आसामच्या धेमाजी जिल्ह्याची रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही व्यक्ती होजाई जिल्ह्यातील लुमडिंग पोलिस ठाणे हद्दीतील रहिवासी आहे. त्याने धार्मिक ओळख लपवून हिंदू नावाने स्वतःची ओळख दाखवली होती. लग्नानंतर त्याने या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता.

लग्नानंतर पैसे लुटून त्याने तामिळनाडू येथून पळ काढला आणि आसामच्या नाखुती भागात पोहोचला, असा दावा या महिलेने पोलिस तक्रारीत केला आहे. त्याने संपर्क न केल्यामुळे अखेर या महिलेने होजाईतील डोबोका भागात त्याचा शोध घेतला. त्यावेळी त्याची खरी ओळख समोर आली. या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच होजाईचे पोलिस अधीक्षक वरुण पुरकायस्थ यांनी लुमडिंग पोलिस ठाण्याला त्याला अटक करण्याचा आदेश दिला. त्याला त्याच्या गावातून बुधवारी रात्री अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here