इगतपुरी येथे मोटारसायकल व क्रेटा कारची धडक; एक तरुण जागीच ठार

इगतपुरी (प्रतिनिधी) : मोटरसायकल व क्रेटा कारची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात इगतपुरी येथील करण मनोहर (१८) हा तरुण जागीच ठार झाला. तर प्रणव राजेंद्र कांबळे (१८) हा तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर संतप्त स्थानिक जमावाने क्रेटा कार जाळून टाकली.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इगतपुरी शहराजवळील पारदेवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सायंकाळी हा भीषण अपघात झाला. कारची धडक दुचाकीला इतक्या जोरात बसली की मोटरसायकलसह एक जण फरफटत गेला तर दुसरा फेकला गेला.

या अपघातात इगतपुरी शहरात डाक बंगला येथे राहणारा करण मनोहर याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर प्रणव राजेंद्र कांबळे हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व स्थानिकांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. एक जण ठार झाल्याचे समजताच जमाव संतप्त झाला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी कार जाळून टाकली. इगतपुरी पोलिसांनी कार चालकास ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here