‘आश्रम ३’च्या सेटवर बजरंग दलाचा हल्ला; क्रू मेंबर्सला पाठलाग करून बेदम मारहाण

भोपाळ (मध्यप्रदेश) : येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजच्या सेटवर हल्ला करत प्रकाश झा यांच्या चेह-यावर शाई फेकत सेटवरच्या साहित्याची तोडफोड केली. सेटवरच्या काही क्रू सदस्यांचा पाठलाग करून त्यापैकी एक-दोघांना पकडून त्यांना मारहाण करत व्हॅनिटी व्हॅनसह पाच वाहनांची तोडफोड केली आहे. या हल्ल्यात ५ कर्मचारी जखमी झाले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात प्रकाश झा यांनी पोलिसात तक्रार करण्यास नकार दिला आहे.

भोपाळच्या जुन्या तुरुंगात (अरेरा हिल्स) आश्रम ३ या वेबसीरिजचं शूटींग सुरू होतं. शूटिंग चालू असताना रविवारी संध्याकाळी बजरंग दलाच्या सुमारे अडीचशे सदस्यांनी सेटवर हल्लाबोल केला. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल मुर्दाबाद अशा घोषणा देत हे कार्यकर्ते सेटवर आले आणि यांनी प्रकाश झा यांना बाहेर बोलवलं.

यादरम्यान संतप्त कार्यकर्त्यांची झा यांच्याशी बाचाबाची झाली. यानंतर आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी व्हॅनिटी व्हॅन, कार, ट्रकमध्ये ठेवलेले सामान, आवारात उभ्या असलेल्या मशिनरींची तोडफोड सुरू केली. सेटवरच्या कर्मचा-यांनी विरोध केल्यावर त्यांना मारहाण करण्यात आली.

बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश झा यांच्यावर आश्रम वेब सीरिजद्वारे हिंदू धर्माची बदनामी केल्याचा आरोप केला. वेबसीरिजचं नाव बदला अन्यथा शूटींग होऊ देणार नाही, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here