गुरुवारपासून पूर्णक्षमतेने धावणार मुंबईतील लोकल

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : मुंबईकरांची जीवन वहिनी म्हणणाऱ्या उपनगरीय लोकल सेवा गेल्या दीड वर्षांनंतर गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने धावणार आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. या लॉकडाऊन काळात रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. नंतर १५ जून २०२० पासून, रेल्वेने राज्य सरकारने निवडलेल्या आणि रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या अत्यावश्यक सेवा श्रेणीं कर्मचाऱ्यांनासाठी उपनगरीय सेवा सुरू केली होती. आता गेल्या काही महिन्यांपासून कोरोना लशीचे दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य नागरिकांना उपनगरीय लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आले आहे. यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. तर, नुकताच एका दिवसात ६० लाख प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली. कोरोना पूर्वीच्या प्रवासी संख्येपेक्षा फक्त २५ टक्के प्रवासी संख्या कमी आहे. या सर्व प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी १०० टक्के फेऱ्या गुरुवारपासून चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य रेल्वेवरून १ हजार ७०२ आणि पश्चिम रेल्वेवरून १ हजार ३०४ लोकल फेऱ्या धावत आहेत. गुरुवारपासून मध्य रेल्वेवरून १ हजार ७७४ फेऱ्या आणि पश्चिम रेल्वेवरून १ हजार ३६७ फेऱ्या अशा १०० टक्के फेऱ्या धावणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रवाशांनाच लोकलमधून प्रवास करण्याची मुभा असल्याचे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here