मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : ड्रग्स प्रकरणी आर्यन खान याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर आर्यन खानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज आर्यन खानच्या जमीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज आर्यन खानला दिलासा मिळतो का, हे पाहावे लागणार आहे. एनसीबीकडून सुद्धा आर्यन खानला बेल मिळू नये, यासंदर्भात पूर्ण तयारी करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
२ ऑक्टोबरच्या रात्री आर्यनला ‘कॉर्डेलिया द इम्प्रेस’ नावाच्या क्रूझवरून एनसीबीने अटक केली. त्यानंतर १७ दिवस उलटून गेले, पण ड्रग्ज प्रकरणात आर्यन तुरुंगातून बाहेर येऊ शकला नाही. शाहरुखचे कुटुंबही तणावात आहे. एनसीबीला आर्यनकडून ड्रग्ज मिळालेले नाही, असा दावा आर्यनच्या वकिलांकडून केला जात आहे. पण एनसीबीने न्यायालयात दावा केला की आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्ज घेत आहे.
मुंबईच्या एनडीपीएस कोर्टाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानचे वकील सतीश मानेशिंदे आणि अमित देसाई यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. न्यायमूर्ती यांनी 26 ऑक्टोंबर रोजी यापुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते. उच्च न्यायालयात या प्रकरणावर सविस्तर युक्तिवाद होईल, त्यानंतर निकाल देण्यासाठी न्यायालय काही वेळ घेईल. उच्च न्यायालय या महिन्याअखेरपर्यंतच नियमित कामकाजासाठी उपलब्ध आहे. त्यानंतर दिवाळीनिमित्त न्यायालयाला दोन आठवड्यांची सुट्टी आहे.






