जळगाव (प्रतिनिधी) : निसर्गमित्र,जळगाव तर्फे ५ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यार असून त्यानिमित्त ‘आम्ही पक्षी अंधश्रद्धेचे बळी’ या विषयावर सर्वांसाठी खुली महाराष्ट्रव्यापी निबंध स्पर्धा घेतली आहे.निबंध ४५० ते ५०० शब्दात मराठी मध्ये लिहून दि.१२ नोव्हेंबर २०२१ पर्यंत त्याचा फोटो काढून ८९९९८०९४१६ या व्हॉटसअॅपवर पाठवावा.
आलेल्या निबंधातून प्रथम, द्वितीय,तृतीय व पाच उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येतील.आणि विजेत्यांना त्यांच्या क्रमांकानुसार व अन्य स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र दि.२१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या व्हॉटसअॅप नंबर पाठवले जाईल, अशी माहिती पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.
दि. ५ नोव्हेंबर रोजी पक्षीतज्ञ मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस आणि दि. १२ नोव्हेंबर रोजी पद्मभूषण डॉ.सालीम अली यांची जयंती आहे.या दिवसांचे औचित्य साधून हा पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. निबंध स्पर्धा घेण्याचा हेतु सांगतांना गाडगीळ म्हणाले की जैवविविधतेतील मोठा घटक असलेल्या पक्ष्यांविषयी समाजात विविध समज गैरसमज व अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत.यामुळे पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून त्यामुळे अनेक पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. उदा. दिवाळीत वशीकरण व धनलाभाच्या उद्देशाने लक्ष्मीचे वाहन असलेल्या घुबडाचा बळी दिला जातो. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार व सोबतच जादूटोणाविरोधी कायदा २०१३ नुसार यांच्यावर कठोर कारवाई होणे हे अत्यंत आवश्यक आहे.हे लक्षात घेऊन याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने ही निबंध स्पर्धा घेतली आहे.या स्पर्धेत
निसर्गप्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले. स्पर्धकाने आपले पूर्ण नाव,पत्ता,शिक्षण,वय व आपला व्हॉटसअॅप मोबाइल क्रमांक व दिनांक ही माहिती निबंधाच्या सुरवातीलाच लिहावी. निबंधाच्या प्रत्येक पानावर पान क्रमांक व पूर्ण नाव लिहावे.स्पर्धेचा निर्णय अंतिम व सर्वांवर बंधनकारक राहील.






