दिलीप प्रभावळकर यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून स्व. प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : अभिनय अनेक छंदांपैकी एक आहे. अनेक लोकांच्या प्रोत्साहानाने या प्रवाहात आणले. त्यातूनच या छंदाचे व्यवसायात रूपांतर झाले. यावेळी समाजात घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब नाटकात दिसते. कुसुमाग्रजांचा सहवास लाभला नाही पण कानेटकरांचा लाभला. आज साहित्यिक आणि सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या याच नाशिक शहरात कानेटकरांच्या नावाने पुरस्कार मिळाला हे माझं भाग्यच, असे प्रतिपादन दिलीप प्रभावळकर यांनी सत्काराला उत्तर देताना केले.

अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, नाशिक शाखेच्या वतीने वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार शफाहत खान, वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार दिलीप प्रभावळकर व बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार रवींद्र ढवळे यांना नाशिकच्या कालिदास कलामंदिर येथे मराठी रंगभूमी दिनाच्या औचित्यावर सोमवार दि. २५ ऑक्टोबर रोजी प्रदान करण्यात आले. यावेळी त्या कार्यक्रमांत शिबानी जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यांच कार्यक्रमात राजकारण्यांच्या सभा, आंदोलनं सगळे कार्यक्रम सर्रास होतात पण नाटकवाल्यांमुळेच नेमका संसर्ग पसरतो, असा समज करून नाटक बऱ्याच काळ बंद ठेवले होते. कारण व्यवस्था नाटकाला घाबरते, पण नाटकावर कितीही संकटं आले तरी नाटक कधी मेलं नाही. तसेच आताही सगळ्या बदलाला पचवून नाटक आजही जिवंत आहे. या काळातून उभारी घेत नाटक नव्याने उभे राहील, असे मनोगत नाट्यलेखन पुरस्काराने सन्मानित शफाहत खान यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असलेले नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, आम्ही राजकारणी सुद्धा नाटकांवर प्रेम करणारी माणसं आहोत. आपले मुख्यमंत्री सुद्धा एक कलाकर आहेत. त्यामुळे नाटकांसारखे सांस्कृतिक कार्यक्रम होत राहणे यासाठी आमचा कायम प्रयत्न असतो. त्यामुळे नाटक सुरू करण्याचा निर्णय घ्यायला मुद्दाम उशीर केला, हे म्हणणे चुकीचं आहे. नाटकामुळे लोकं दोन-तीन तास एकत्र येतात, तेव्हा संसर्गाची शक्यता अधिक होती म्हणून काळजीपोटी अशी भूमिका घेतली होती. पण कलाकारांना अनेक संकटातून जावं लागलं याची आम्हाला कल्पना आहे. पण जशी टी.व्ही. मिडिया आली म्हणून वर्तमानपत्र संपले नाही, तसे बंदमुळे जरी ओ.टी.टी.ला लोकं जोडले असले तरीसुद्धा तुम्ही तयारीला लागा. नाटक सुरू झालं म्हणजे लोकं प्रतिसाद नक्कीच देतील, असे प्रतिपादन केले.

यावेळी मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींचा सन्मान, विशेष योगदान पुरस्कार व दिवंगत रंगकर्मींच्या कुटुंबियांचा सन्मान पुरस्कारांचंही वितरण करण्यात आले. यावेळी रवींद्र कदम, शाहू खैरे, सुनील ढगे, डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांसह सर्व सभासद, रंगकर्मी व रसिक प्रेक्षकांनी उपस्थिती दर्शविली.

मराठी रंगभूमी विशेष पुरस्कार- स्वर्गीय दत्ता भट पुरस्कार अभिनय पुरुष : राजेंद्र चव्हाण, स्वर्गीय शांता जोग स्मृती पुरस्कार, अभिनय स्त्री : रोहिणी ढवळे, स्वर्गीय प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार, दिग्दर्शन : रवींद्र कदम, स्वर्गीय नेताजी तथा दादा भोईर स्मृती पुरस्कार, लेखन : विवेक गरुड, स्वर्गीय वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार : धनंजय वाबळे, बालरंगभूमी स्वर्गीय जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार, सांस्कृतिक पत्रकारिता : फणींद्र मंडलिक, स्वर्गीय रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार, नेपथ्य : चंद्रकांत जाडकर, स्वर्गीय गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार, प्रकाशयोजना : विजय रावळ, स्वर्गीय रामदास बरकले स्मृती पुरस्कार, लोक कलावंत : रमाकांत वाघमारे, स्वर्गीय शाहीर गजाभाऊ बेणी स्मृती पुरस्कार : राजन अग्रवाल, विशेष योगदान पुरस्कार सन २०२०-२१ चे मानकरी – अविराज तायडे, सुभाष दसककर, नितीन वारे, नवीन तांबट., विशेष पुरस्कार कोविड योद्धा- डॉ. संजय धुर्जड, डॉ. मिलिंद पवार., विशेष सन्मान- साहित्य अकादमी पुरस्कार विजेता – प्राजक्त देशमुख, झी लावण्यवती – क्षमा देशपांडे, झी लावण्यवती नृत्यांगना – शिरीन पाटील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here