दोन वर्षांच्या चिमुरडीला स्कूल बसने चिरडले

बडवानी (मध्यप्रदेश) : येथे बुधवारी एका स्कूल बसने एका २ वर्षांच्या चिमुरडीला चिरडून टाकले आहे. या मुलीच्या डोक्यावरुन बसचे एक चाक गेले. ही निरागस मुलगी आपला भाऊ स्कूल बसमधून उतरला, म्हणून त्याला आणण्यासाठी तिच्या वडिलांच्या मागोमाग चालली होती. उंचावर असलेल्या ड्रायव्हरच्या लक्षात ते आले नाही, त्याच्या दुर्लक्षामुळे त्याने या लहानगीला चिरडले आणि तो पुढे निघाला.

या घटनेनंतर चालत्या बसमधून ड्रायव्हरने उडी मारली. बसमध्ये अजून १२ लहान मुलं होती, ड्रायव्हर चालती बस सोडून पळाल्याने मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. मात्र आजूबाजूच्या लोकांनी धावत जाऊन बसचे ब्रेक दाबले, आणि गाडीवर नियंत्रण मिलवले, त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली.

या दुर्देवी अंत झालेल्या लहानगीचे नाव यशिका राठोड असे आहे. ही दुर्घटना बुधवारी संध्याकाळी चारच्या सुमारास घडली. ह्रद्याचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. द अग्रवाल पब्लिक स्कूलची बस पलसूदवरुन गंधवालला मुलांना सोडण्यासाठी आली होती. यशिकाचा मोठा भाऊ याच शाळेत शिकतो. बस थांबल्यानंतर यशिकाचे वडील अंतीम राठोड मुलाला आणण्यासाठी गेले, त्यांच्या पाठोपाठ ही दोन वर्षांची चिमुरडीही गेली होती.

यशिका बस क्रॉस करत असतानाच, ड्रायव्हरने गाडी पुढे नेली, त्यात तिच्या डोक्यावरुन बस गेली. त्यानंतर ड्रायव्हर चालत्या गाडीतून उडी मारुन पळून गेला. या ड्रायव्हरच्या बेपर्वाईमुळे मुलीचा मृत्यू झाला आणि चालती बस सोडून पळाल्याने इतर १२ मुलांचे प्राणही संकटात सापडले होते. आता पोलीस या ड्रायव्हरचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here