मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला हायकोर्टाकडून जामीन मंजूर झाला असला तरी त्याला आज जामीन मिळणार नाहीय. कारण जामीनासाठी लागणारे कागदपत्रे संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत जेल प्रशासनाच्या पत्रपेटीत पोहोचणं अपेक्षित होतं. पण ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज आर्यनची सुटका होणार नाही.
ऑर्थर रोड जेल प्रशासनाकडून याबाबतची माहिती जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आर्यनला आजची देखील रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे. आर्यन खान आज ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडणार नाही. कुणासाठीही नियम बदलणार नाही. जामीनासाठी संध्याकाळी साडेपाच वाजता पत्रपेटी आम्ही उघडलेली होती. पण तिथे आर्यनच्या जामीना संबंधित कोणतेही कागदपत्रे नव्हती. त्यामुळे आर्यनची आज जेलमधून सुटका होणार नाही, अशी माहिती ऑर्थर रोड जेलकडून देण्यात आली आहे.
एनसीबीने केलेल्या क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील कारवाईत आर्यन खान अडचणीत आला होता. त्याच्या जामीनासाठी शाहरुख खानने मातब्बर वकिलांची फौज कामाला लावली होती. पण एनसीबीच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादांपुढे हे वकील काहीसे कमी पडताना दिसत होते. अखेर तीन दिवसांपूर्वी हायकोर्टात ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांच्यासोबत कोर्टात आर्यनची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी दाखल झाले. त्यांनी सलग दोन दिवस आर्यनच्या बाजूने युक्तीवाद केला.
यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणांचा दाखला दिला. तसेच त्यांनी विविध कलमांचा दाखल दिला. त्यांनी केलेल्या युक्तीवादानंतर अखेर गुरुवारी (२८ ऑक्टोबर) हायकोर्टातून आर्यनला जामीन मंजूर झाला. पण जामीन मंजूर झाल्यानंतर त्याची लगेच कोर्टातून सुटका होणार नाही. त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागते.






