नवी मुंबईत कुटुंबाची सामूहिक आत्महत्या, आईसह मुलगा-मुलीचा मृत्यू

poision-suicide
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : दिवाळीपूर्वी नवी मुंबईतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आले आहे. नवी मुंबईतील वाशी परिसरात ही घटना घडली असून, कुटुंबातील आई, मुलगा आणि मुलीने सामूहिक आत्महत्या केली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८५ वर्षीय मोहिनी कामवानी या आपल्या कुटुंबासोबत वाशी परिसरात राहत होत्या.

त्यांच्यासोबत मुलगा दिलीप कामवानी (६७ वर्षे) आणि मुलगी कांता कामवानी (६१ वर्षे) हे सुद्धा राहत होते. या तिघांनी विष प्राशन करुन सामूहिक आत्महत्या केली. विष प्राशन केल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला होता. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, तिघांचाही मृत्यू झाला.

या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मात्र, दिवाळीपूर्वी घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील तिघांनीही आर्थिक नैराश्येतून हे पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

तिघांनीही दोन दिवसांपूर्वी उंदीर मारण्याचं औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. औषध प्राशन केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी त्यांंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र, दुर्दैवाने तिघांचाही मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here