कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : जिल्ह्यातील खोची (ता. हातकणंगले) येथील एका बेपत्ता झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून, तिचा खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. अत्याचार करणाऱ्या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या घटनेमुळे खोची गाव व परिसरात नागरीकातून संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, आज दुपारी १२ वाजेपासून खोची गावातून एक सहा वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. वडील, कुटुंबीय शोध घेत होते. सोशल मीडियावर मुलगी हरवल्याचा मेसेज देखील व्हायरल करण्यात आला होता. दरम्यान, दुपारी चार वाजेच्या सुमारास कब्रस्तानमध्ये एका झाडाखाली एका मुलीचा मृतदेह आढळून आला. तिच्या अंगावर मारहाण केल्याचे व्रण दिसत होते. तिच्यावर अत्याचार करुन गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.
या प्रकरणी एका संशयीतास पेठवडगांव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, अप्पर पोलीस अधिक्षक तिरुपती काकडे, डीवायएसपी रामेश्वर वैंजाने यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे पुढील तपास करीत आहेत.






