पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी साध्या वेशात गस्त घालणाऱ्या गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलीस शिपायाला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
ही घटना शनिवारी (दि.३०) रात्री सव्वाआठच्या सुमारास देहूरोड बाजार (Dehu Road) येथे घडली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. अरविंद लक्ष्मण ढिल्लोड (रा. पारशीचाळ, देहूरोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर शंकर गाडेकर (वय-36) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेकर हे देहूरोड बाजारात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर साध्या वेशात गस्त घालत होते. त्यावेळी बालाजी लंच होम येथे आरोपीने शिवीगाळ करुन त्यांच्यासोबत झटापट केली. त्यांना जमिनीवर खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी करत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय ढमाळ करीत आहेत.






