सांगलीत टायर फुटल्याने कारने दिंडीला चिरडलं; तीन भाविक ठार

सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : पायी चालत जाणाऱ्या कर्नाटकातील भाविकांना सांगलीत खासगी चारचाकी वाहनाने चिरडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. टायर फुटल्याने समोरुन येणाऱ्या मोटार सायकलला धडकून कारने दिंडीला चिरडले. या अपघातात तिघा जणांना प्राण गमवावे लागले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथील प्रसिद्ध असणाऱ्या महालिंगराया यात्रेसाठी कर्नाटकचे भाविक पायी निघाले होते.

या अपघातात बसवराज दुर्गाप्पा चिंचवडे (रा. मदभावी तालुका लिंगसूर जिल्हा रायचुर), नागप्‍पा सोमांना आचनाळ (रा. देवभूसर तालुका लिंगसूर जिल्हा रायचूर) आणि म्हणप्पा दुर्गप्पा गोंदीकल अशी मृत्यू झालेल्या तिघा भाविकांची नावे आहेत. हुलजंती तालुका मंगळवेढा येथे दीपावलीच्या निमित्ताने महालिंगराया यात्रा मोठ्या प्रमाणात भरते या यात्रेसाठी कर्नाटकातील लोक मोठ्या प्रमाणात येत असतात.

या यात्रेसाठी कर्नाटकातील रायचूर येथून भाविक पायी चालत निघाले होते. पंढरपूर ते विजयपूर मार्गावरील उमदी पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शेवाळे वस्ती जवळ त्यांना अपघात झाला. पुण्याहून पोलो या चार चाकी गाडीचा (वाहन क्रमांक एम एच १२-८५९८) टायर फुटून भीषण अपघात झाला. यात तीन भाविकांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ भेट देऊन जखमींला रुग्णालयाकडे पाठवण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here