सांगली (जिल्हा संपादक संजय तोडकर) । सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी यांची मासिक गुन्हे आढावा बैठक गुरुवारी (दि. २६) रोजी धेतली. या बैठकीत मागील महिन्यात दाखल झालेले गुन्हे, उघड गुन्हे, प्रलंबित गुन्हे, अकस्मात मयत, अर्ज चौकशीबाबत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या.
गुन्हे आढावा बैठकीदरम्यान गंभीर गुन्ह्यांची उकल तसेच उत्कृष्ट कामगिरी करणा-या सांगली जिल्ह्यातील १२ पोलीस अधिकारी व ५६ अंमलदार यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच अंमली पदार्थ बाळगणा-यांवर अंकुश रहावा म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील पोलिस विभागातंगर्त रेकॉर्डवरील आरोपींची आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती. या आदान प्रदानाच्या वेळेस ४८ आरोपी उपस्थित होते. या आरोपींची इत्यंभूत माहिती अद्ययावत करण्यात आली. सर्व पोलीस ठाणे व गुन्हे प्रकटीकरण पथकास या आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ज्या आरोपींवर दोनपेक्षा जास्त गुन्हे आहेत किंवा वारंवार गुन्हे करणा-या आरोपी विरोधात म.पो.का. कलम ५५, ५६, ५७ प्रमाणे तडीपारीची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक घुगे यांनी दिल्या. सदर आदान प्रदान कार्यक्रमास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागांचे उप विभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि पोलीस ठाण्यातील डी.बी. अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.








