आर्यन खान सुटकेसाठी झालेल्या डीलचे पुरावे पोलिसांच्या हाती; लवकरच दाखल होणार गुन्हा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आर्यन खानच्या सुटकेसाठी झालेल्या १८ कोटींच्या डील प्रकरणात मुंबई एसआयटीच्या हाती महत्वाचे पुरावे लागले आहेत. या पुराव्यांवरून एसआयटी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात असून लवकरच या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीकडून अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या सुटकेसाठी किरण गोसावी आणि शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी यांच्यात १८ कोटी रुपयांची डील करण्यात आली होती. त्यापैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा खळबळजनक खुलासा या गुन्ह्यातील पंच प्रभाकर साईल याने केला होता.

या डीलची पहिली ५० लाखांची रक्कम घेण्यासाठी साईल याला ताडदेव येथील इंडियन बारजवळ पाठवण्यात आले होते, अशी माहिती प्रभाकर साईल याने पोलिसांना दिली. हा प्रकार गंभीर असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांची एक एसआयटी बनवण्यात आली आहे. मुंबई एसआयटीने पंच प्रभाकर साईल याचा जबाब नोंदवून तपास सुरू केला होता. मुंबई एसआयटीने किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांची लोअर परळ येथे मर्सडीज कारमध्ये झालेल्या बैठकीचे पुरावे हाती लागले आहेत. एसआयटीच्या हाती मर्सडीज कार ज्या ठिकाणी थांबली होती, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळून आले आहेत. या फुटेजच्या आधारे मुंबई एसआयटी गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात असून लवकरच गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here