अनिल देशमुखांना इडीकडून आणखी एक धक्का

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अनेकदा समन्स बजावल्यानंतर अखेर देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले. देशमुखांचा तब्बल १२ तास चौकशी केल्यानंतर अखेर त्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली. पण आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

देशमुखांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीने समन्स बजावले आहेत. ईडीच्या समन्सनुसार ऋषिकेश देशमुख यांना ऐन पाडव्याच्या दिवशी आज (दि. ५) चौकशीसाठी कार्यालयात उपस्थित राहावं लागणार आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर खळबळजनक आरोप केले होते. देशमुखांनी सचिन वाझेंना १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप परमबीर सिंगांनी केला होता. या आरोपानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार ईडी आणि सीबीआय या आरोपांची चौकशी करत आहेत. देशमुखांना 5 वेळा समन्स बजावण्यात आले, त्यांच्या नावाची लूकआउट नोटीस निघाल्यानंतर अखेर अनिल देशमुख समोर आले. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या मुलालाही आता समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here