कंगना रणौतचा पद्मश्री पुरस्कार परत घेऊन तिच्यावर गुन्हा दाखल करा – नवाब मलिक यांचा हल्लाबोल

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : केंद्र सरकारने कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा. कंगना यांना अमली पदार्थाचा डोस जास्त झाल्याने, त्या अशी वक्तव्य करत असल्याचा टोला राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. कंगना यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्र्यसैनिक तसेच सीमेवर लढणाऱ्या जवानांचा अपमान झाला आहे. गांधीजीपासून सर्वच स्वातंत्र्यसेनानी यांचा हा अपमान करण्यात आला असून, कठोर शब्दात कंगना रणौत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो असंही प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी म्हटले.

तसेच केंद्र सरकारने कंगना रणौतला दिलेला पद्मश्री पुरस्कार लवकरात लवकर परत घ्यावा आणि त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे स्वातंत्रसेनानीचा अपमान झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

एका मुलाखतीत कंगना रणौत हिनं स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली की, ‘स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं असेल तर ते स्वातंत्र्य असेल का? सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेता सुभाषचंद्र बोस या लोकांबाबत बोलायचं झाल्यास, या सर्वांना माहित होतं की रक्त सांडलं तर हे लक्षात ठेवावं लागेल की हे आपल्या भारतीयांचं नसेल. त्यांनी स्वातंत्र्याची किंमत चुकवली. पण ते स्वातंत्र्य नव्हतं. भीक होती. खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here