मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मानेचा त्रास झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. पण त्यांच्या प्रकृतीवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टीका करण्याची संधी सोडली नाही. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते आणि स्वकीयांना वाचवण्यात व्यस्त असल्यानेच त्यांना मानेचा त्रास झाला’, असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं.
भाजपचे नेते किरीट सोमय्या आज बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. काँग्रेसचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांच्या संस्थांना बुलडाणा अर्बन दिलेल्या कर्जाच्या प्रकरणी माहिती घेण्याकरिता आले होते.मात्र यावेळी आयकर विभागाला सर्व कागदपत्रे बुलडाणा अर्बनकडून दिल्या जात असल्याचं सांगून त्यांनी बुलडाणा अर्बनला क्लीन चिट दिली.
मात्र या वेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मानेच्या दुखण्यावरूनही टीका केली. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पैसे मोजत होते, त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. स्वत: च्या बायकोचे बेकायदेशीर बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी ते व्यस्त होते.
मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगले बांधले होते, ते वाचवण्यासाठी व्यस्त होते. त्यामुळे त्यांना मानवर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. अनिल परब यांनी कोरोनाच्या काळात दापोलीमध्ये रिसॉर्ट बांधला मार्च २०२० मध्ये वीजेचं कनेक्शन घेतलं आणि आता मार्च २०२१ला उद्घाटन केलं, त्यांना वाचवण्यासाठी ते व्यस्त होते, असं वक्तव्य किरीट सोमय्यांनी केलं.






