ठाणे वाहतूक पोलिसांची एकाच दिवशी पाच हजार वाहनांवर कारवाई

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाच्या विरोधात ठाणे वाहतूक शाखेने धडक मोहीम सुरु केली आहे. त्यातून गुरुवारी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल पाच हजार वाहन चालकांवर एकाच दिवशी कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. त्यात एकाच दिवसात पाच हजाराहून अधिक वाहनधारकांकडून २ लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

रिक्षा, टेक्सी, कॅबच्या ड्रेस न घातलेल्या ४८३ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. नियमापेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५४१ वाहनांवर तर परवाना नसताना अथवा अवैध असताना देखील वाहन चालवणाऱ्या २०० वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच विनाहेल्मेट मोटारसायकल चालवणाऱ्या १ हजार २१४ तर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या ९४ मोटारसायकल चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्याच बरोबर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ३२, कोरोना नियम न पाळणाऱ्या ११, विना सीटबेल्ट असलेल्या २४५, सिग्नल मोडणाऱ्या ९९, भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या ६०, विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या ५९, वाहन चालविताना फोन वर बोलणाऱ्या ४४, वाहन परवाना अवैद्य असलेल्या २२७ चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच इतर प्रकारे नियमभंग करणाऱ्या १ हजार ८०९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. अशाप्रकारे गुरुवारी दिवसभरात एकूण ५ हजार ११८ नियम न पाळणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

वाहतूक पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे न जाण्यासाठी हेल्मेट घालणे, ड्रेस वापरणे, वाहतूक नियमांचे पालन करणे अशा गोष्टींचा अवलंब करावा जेणे करून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, असे आवाहन ठाणे वाहतूक शाखेचे उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी वाहन चालकांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here