अहमदनगर (प्रतिनिधी) : शहरातील मार्केटयार्ड मधील व्यावसायिक गाळ्याच्या मालकीवरुन वाद पेटला असताना जागेचा ताबा न सोडणार्या व्यक्तीच्या पत्नीने शुक्रवारी (दि.12 नोव्हेंबर) दुपारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न करुन पोलीसांशी हुज्जत घातली. सदर जागेचा वाद मिटवण्यासाठी कोतवालीचे पोलीस पंचनाम्यासाठी आले असता सदर गाळ्यात हा प्रकार पोलीसांच्या समोरच घडला.
शहरातील मार्केटयार्डमध्ये दोन हजार चारशे चौ.मी. क्षेत्रफळाचे व्यावसायिक गाळा आहे. सदर जागा अजित अनिल औसरकर यांनी मे २०२१ मध्ये जागा मालक शशिकला पोपटलाल बोरा व महेश पोपटलाल बोरा यांच्याकडून रजिस्टर खरेदीखताने विकत घेतली आहे. जागा मालकाने औसरकर यांना सदर जागेचा ताबा दिला होता. मात्र जागा विकणार्या बोरा यांच्या एका नातेवाईकाने जागेचा ताबा घेऊन सदर जागा सोडण्यास नकार दिला. यानंतर ताबा न सोडणार्या व्यक्तीस नोटीस बजावण्यात आली. नोटीस काळावधी संपल्यानंतर गुरुवारी जागा मालक अजित औसरकर व जागेचा मुख्तारनामा दिलेल्या मोनिका पवार यांनी सदर जागा ताब्यात घेतली.
शुक्रवारी कोतवाली पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी गटातील संबंधीत व्यक्तींना बोलावून विचारपूस करण्यात आली. यानंतर पोलीस प्रशासन मार्केटयार्ड येथील गाळ्याच्या ठिकाणी पंचनामा करण्यास आले असता, हा धक्कादायक प्रकार घडला. पोलीसांनी आत्मदहन करणार्या महिलेस ताब्यात घेतले. यावेळी पोलीसांशी सदर महिलेने हुज्जत घातली. यावेळी घटनास्थळी तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले होते. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. रितसर मार्गाने जागेचा ताबा घेतल्याने ताबा न सोडणार्या व्यक्तीची पत्नी वारंवार आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहे. जागेच्या वादातून समोरील व्यक्तींकडून जीवाला धोका निर्माण झाला असल्याने पोलीस संरक्षण मिळण्याची मागणी जागेचा मुख्तारनामा असलेल्या मोनिका पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटले आहे.






