शनिवारी दिवसभराच्या हिंसाचारानंतर अमरावती शहर शांत

अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : त्रिपुरा राज्यात कथित अत्याचाराविरोधात अमरावतीत शुक्रवारी दुपारी एका समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर १५ ते २० हजार लोकांनी निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चाला हिंसक वळण मिळाले होते. यात शहरातील पाच ते सात दुकानांची तोडफोड झाली व काही दुकानदारांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ शनिवारी (दि.१३) भाजपकडून अमरावतीत बंद पुकारण्यात आला होता. या बंदलाही हिंसक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळाले.

दिवसभर शहरात भीतीचे वातावरण असताना दुपारी शहरात संचारबंदी घोषित करण्यात आली. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण संतप्त जमावाला पांगवण्यात पोलिसांना यश आले. आता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण शहरात आणि शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून शहराला सध्या पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. दिवसभराच्या हिंसाचारानंतर सायंकाळी अमरावती शहर शांत झाले आहे.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि डॉ. अनिल बोंडे यांच्यासह महापौर चेतन गावंडे, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, माजी शहराध्यक्ष तुषार भारतीय आणि जयंत डेहनकर यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे शुक्रवारी शहरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शहर बंदचे आवाहन यावेळी करण्यात आले असतानाच भाजप युवा मोर्चाच्या वतीने अंबापेठ परिसरात दगडफेक करण्यात आली. यानंतर शहर बंदला हिंसेचे गालबोट लागले आणि काही क्षणातच अंबापेठ, प्रभात चौक, चित्रा चौक, सक्करसात, हर्षराज कॉलनी, कठोरा नाका, रवीनगर या भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या.

शहरातील अंबापेठ नमुना परिसर, गांधी चौक, प्रभात चौक, चित्रा चौक या परिसरात हिंसाचाराला आळा घालताना जमावाने पोलिसांवरही हल्ला चढवला. जमावाच्या हल्ल्यात सचिन लाकडे, अभिजीत भारुडकर, जमील अहमद हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. दोन गटामधील हाणामारीत दरम्यान संदीप मंगळे नामक व्यक्तीला हातावर तलवार लागल्याने तेही गंभीर जखमी झाले. गांधी चौक परिसरात पोलिसांनी सोडलेले अश्रू नळकांडे एका युवकाने हातात झेलताच त्याच्या हाताला गंभीर इजा झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here