कार्तिक दिंडीतील भाविकांना वाहनाची धडक; ११ जखमी

kartik-dindi-warkari-injured-in-road-accident

भंडारा (प्रतिनिधी) : कार्तिक एकादशीनिमित्त भंडाऱ्यावरुन पवनीकडे निघालेल्या पायी दिंडीतील भाविकांना एका भरधाव वाहनाने धडक दिल्याने ११ भाविक जखमी झाले असून त्यापैकी पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ ते नवेगाव फाटादरम्यान रविवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना अड्याळ व भंडारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

लक्ष्मण किसनराव वानखेडे (६८), वसंत बाबुराव कुर्वे (४५), प्रसन्न महाजन (६८) तीघे राहणार भंडारा, सारिका नंदकिशोर वानखेडे (४५) रा.शहापूर, नितीन लक्ष्मीकांत व्यवहारे (५५) रा.नागपूर आणि वाहनचालक दिनेश जागो वाघाडे (२८) रा.वाकेश्वर अशी जखमींची नावे आहेत. कार्तिक एकादशीनिमित्त भंडारा ते पवनी त्रिदिनीय पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही दिंडी रविवारी अड्याळ येथे पोहचली. दुपारी भोजन करुन २ वाजताच्या सुमारास दिंडीने पवनीकडे प्रस्थान केले.

या दिंडीत २२ भाविक सहभागी होते. दाेन-दाेनच्या रांगेने जात असाता अड्याळ ते नवेगाव फाटादरम्यान मागून आलेली मारुती ओमनी कार थेट या दिंडीत शिरली. रस्त्याकडी रांगेतील ११ भाविकांना या कारची धडक लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. तसेच परिसरातील नागरिकही घटनास्थळी धावून गेले. जखमींना तात्काळ अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. या अपघातात अपघात करणाऱ्या कारचा चालक दिनेश वाघाडेही जखमी झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here