मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : कांजूरमार्ग परिसरातील अपेक्स कंपाऊंडमध्ये असलेल्या सॅमसंगचा सर्विस सेंटरमध्ये लागलेली आग मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली आहे. काल रात्री नऊच्या सुमारास भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाच्या १८ ते २० गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. तब्बल साडे तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
पोलिसांच्या माहितीप्रमाणे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. सध्या आगीच्या संदर्भात अधिक तपास अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस करत आहेत. सध्या सर्विस सेंटरमध्ये फायर कूलिंगचे काम सुरू आहे. सुदैवाने या आगीमध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सॅमसंग कंपनीचं मोठ्याप्रमाणात सामान जळून खाक झालं आहे. तर बाजूला असलेलं सफोला तेलाचं गोडाऊनसुद्धा या आगीमध्ये जळून खाक झाला आहे.
दरम्यान सॅमसंगचा सर्विस सेंटरमधून या आगीला सुरुवात झाली. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदाम आहेत. डबावाला कंपाऊंडजवळ ही आग लागली होती. तर आजूबाजूच्या गोदामामध्ये सिलेंडर असल्यामुळे जोरात सिलेंडरचा स्फोट देखील होत होते. पण अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने वेळेच यावर नियंत्रण मिळवता आलं. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटर आणि सफोला तेलाच्या गोदामाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.






