सासरच्या लोकांनीजावयास दहा लाखास गंडविले; गुन्हा दाखल

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : वाहन बाजार व्यवसाय सुरू करण्यासाठी सासरच्या मंडळीने जावयास दहा लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. शालकाने पैसे घेवून पोबारा केल्याने ही घटना समोर आली असून,पैसे देण्यास टाळाटाळ होत असल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सासू सास-यासह शालकाविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी विहीतगाव येथील मोतीराम शिंदे यांच्या फिर्यादीवरून विश्वनाथ सोनवणे, सुजाता सोनवणे व शालक आनंद सोनवणे या तिघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार हे सोनवणे यांचे जावई आहेत. शिंदे यांचे शालक आनंद सोनवणे यांना वाहन बाजार व्यवसाय सुरू करायचा होता. त्यासाठी सोनवणे कुटुंबियांनी आपल्या जावयाकडे पैश्याची मागणी केली होती.

अल्पावधीतच रोकड परत करण्याची ग्वाही देण्यात आल्याने जावई शिंदे यांनी १६ जानेवारी २०२१ रोजी नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या धनादेशाद्वारे दहा लाखाची रोकड अदा केली. मात्र शालकाने व्यवसाय सुरू केला नाही. त्याने रोकड घेवून पोबारा केल्याने जावई शिंदे यांनी उर्वरीत ९ लाखासाठी तगादा लावला मात्र सासू सास-याने आज – उद्या देवू असे म्हणत वेळ मारून नेली. आजतगायत रोकड हाती न लागल्याने जावई शिंदे यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भामरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here