अहमदाबाद (गुजरात) : येथील महानगरपालिकेकडून रस्त्यांच्या किनाऱ्यालगत लावण्यात येणाऱ्या मांसाहारी पदार्थांच्या स्टॉल्स आणि हातगाड्यांवर कारवाई सुरू करण्यात आलीय. शाळा, महाविद्यालय आणि धार्मिक स्थळांच्या १०० मीटर परिघात येणाऱ्या आजुबाजुच्या दुकानांवर ही कारवाई होतेय.
यासंबंधी आदेश मिळाल्यानंतर अहमदाबाद महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यांवरचे स्टॉल्स हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय. या दुकानांतील सामानासहीत गाड्यांवर जप्तीची कारवाई करत कर्मचाऱ्यांनी ट्रकांत भरल्या. वडोदरा, राजकोट आणि द्वारका या भागांत ही कारवाई करण्यात आली. नगररचना समितीचे सभापती देवांग दाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यांवरून अंडी आणि मांसाहारी पदार्थ ठेवणाऱ्या गाड्यांना हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पालिकेच्या कारवाईमुळे रस्त्यांवरचे विक्रेते मात्र चांगलेच चिडलेत. मांसाहारी पदार्थ ठेवणाऱ्या रस्त्यांवरच्या गाड्यांवर कारवाई मात्र दुकानांत परवानगी, हा कुठला न्याय? असा प्रश्न या विक्रेत्यांनी उपस्थित केलाय.






