सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : येथे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात दुफळी निर्माण झाली असून संपाच्या ९ व्या दिवशी गालबोट लागले आहे. एसटी वाहकाने वाहतूक नियंत्रकाला मारहाण केली असून या मारहाणीत नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.सध्या त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एसटीचा संप सुरू असताना वाहक राजू पवार हे शिवशाही बस पुण्याला घेऊन गेले होते यावर इतर संपकरी कर्मचाऱ्यांनी बस का घेऊन गेला? अशी विचारणा केली म्हणून किरकोळ बाचाबाची होऊन यामध्ये मारहाणीची घटना घडली आहे.सातारा आगारातील वाहक क्रमांक ६६२३ राजू पवार याने वाहतूक नियंत्रक अमित चिकणे यांच्या डोक्यात दगड घातला आहे.
दरम्यान, घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस दाखल झाले. मारहाण करणाऱ्या वाहकास पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतले असून त्याच्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






