मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : अंधेरी पश्चिमेत क्लीन अप मार्शला मारहाण करण्यात आली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. क्लीन-अप मार्शलच्या दादागिरीमुळे एका महिलेकडून दोन क्लीन-अप मार्शलला मारहाण करण्यात आली असल्याचे समजते आहे.
अंधेरी पश्चिम येथील एस.वी रोडवर गुरुवारी (दि.१८) संध्याकाळी एक महिला रिक्षामध्ये मास्क तोंडाच्या थोडं खाली घालून जात होती. अशातच बीएमसीच्या दोन क्लीन-अप मार्शल्सनी त्या महिलेचे फोटो काढून २०० रुपयाच्या दंडाची पावती फाडली.
मात्र, यावरुन महिला आणि क्लीन-अप मार्शलमध्ये बाचाबाची सुरु झाली आणि याचे रुपांतर हाणामारीत झाले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. यात क्लीनअप मार्शल गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुपक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी मुंबई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारेकऱ्यांचा शोध सुरु आहे.






