पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : येथील ससून रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल असलेला खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी किशोर आत्माराम शिरसाठ (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) हा बाथरूमच्या खिडकीतून पळून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. यानंतर अवघ्या एका तासातच आरोपीला त्याच्या येरवडा येथील घरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरसाठ याने पत्नीचा ऑक्टोबर महिन्यात खून केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला डायलेसीस करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ससून रुग्णालयाच्या एम आयसीयू विभागात १५ नोव्हेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला मंगळवारी डिचार्ज मिळणार होता.
किशोर शिरसाठ हा सकाळी बाथरूममध्ये गेला. तिथे पाण्याचा नळ चालू ठेऊन तो खिडकीतून बाहेर पडला. त्यानंतर खाली उतरून त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला जखम झाली आहे. आरोपी बाथरूममधून बाहेर येत नसल्याचे पाहून ड्युटीवरील पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यावेळी तो पळून गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर तत्काळ त्याचा शोध सुरू करण्यात आला. त्याच्या घराकडे पोलीस पाठवण्यात आले. शिरसाठ हा ससूनमधून पळाल्यानंतर लंगडत मिळेल त्या वाहनाने लक्ष्मीनगर येथे घरी गेला. पण, त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत.






