गडचिरोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील कुनघाडा वनपरीक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या मुरमुरी शेतशिवारात २२ नोव्हेंबरला सरिचा चहाकाटे (वय ७०) या आजी आपल्या शेतात काम करत होत्या. दरम्यान तहान लागल्याने त्या बांध्यावर गेल्या. त्या पाणी पीत नाहीत तोच समोर वाघ आला. वाघाला बघून आजीची भंबेरी उडाली. पण मृत्यू डोळ्यासमोर बघून आजीने न घाबरता त्या वाघाशी दोन हात करण्याचे ठरविले. तेवढ्यात वाघाने आजीवर पंजा मारण्याचा प्रयत्न केला. आजीने देखील त्याच आवेशात वाघावर हात उगारला.
जवळपास १० मिनिटं ही झुंज चालली. मग काय, प्रतिहल्ला झाल्याचे बघून वाघाने तेथून धूम ठोकली. आजीने केलेला आरडाओरड ऐकून बाजूला शेतात काम करणारे मदतीला धावून आले. मात्र, तो पर्यंत वाघ पळून गेला होता. आजीने वाघाशी दिलेली झुंज संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
२२ नोव्हेंबरला दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या आजीला महिलेला कुठलीही इजा झालेली नाही. वनविभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे आज या आजीचा जीव वाचला आहे.
नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे दहशतीत असलेला गडचिरोली जिल्हा आता वन्यप्रण्यांच्या दहशतीमुळेही चर्चेत आहे. ताडोबा वनक्षेत्रातून पलायन केलेल्या जवळपास १० ते १५ वाघांनी या भागात बस्तान मांडल्याने नागरिकांवरील त्यांचे हल्ले वाढले आहेत. आत्तापर्यंत वाघाने १८ नागरिकांचा बळी घेतला आहे. यामुळे वनविभागासमोर नवे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र आहे.






