सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू करण्याची शिवसेनेची मागणी

पनवेल (विशेष प्रतिनिधी) : सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते पळस फाटा या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व उड्डाण पुलावर बसवण्यात आलेले दिवे मागील दोन वर्षांपासून बंद असून त्यामुळे अनेक वेळा सतत अपघात झालेले आहेत. संध्याकाळी सहानंतर प्रवास करतेवेळी रात्री प्रत्येक वाहनचालकाला व नागरिकांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो.

रस्त्यावरील अंधारामुळे अपघाताचे वाढते प्रमाण व वाहनचालकांची होणारी गैरसोय पाहता ज्येष्ठ शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी तेरा महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अवर सचिव यांची मंत्रालयात भेट घेऊन उचित कारवाई करण्याचे आदेश व उपाययोजना करण्याची विनंती केली होती.

१३ महिन्यात संबंधित विभागाने काहीच हालचाल न केल्याने गवळी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट तक्रार करून कैफियत मांडली आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ तपासून कारवाई करावी व सर्व पथदिवे विनाविलंब चालू करावे असे स्पष्ट आदेश निर्देश मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई यांना दिले आहेत. संबंधित विभागाने अधिकाऱ्यांनी येत्या एक महिन्यात सायन-पनवेल महामार्गावरील उड्डाणपुलावरील पथदिवे सुरू करावे अशी मागणी गवळी यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनीही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here