जामखेड तालुक्यात व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत अल्पवयीन मुलगा व मुलीची एकाच दिवशी आत्महत्या

अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात जामखेड तालुक्यातील आपटी गावात अल्पवयीन मुलगा आणि मुलीने एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केली. दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. प्रथम यातील अल्पवयीन मुलीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी तिचा प्रियकर म्हणविला जाणारा मुलगाही तेथे आला. त्यानंतर काही तासांत त्यानेही शेतात जाऊन लिबांच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करीत असल्याचे स्टेटस त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर ठेवले होते.

एकाच दिवशी दोघा अल्पवयीनांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे. नितीन (वय १७) आणि लता (वय १६, दोघांचीही नावे बदललेली) या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगण्यात येत होते. बुधवारी दुपारी यातील लता हिने घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. याची माहिती मिळाल्यानंतर नागरिक जमा झाले. त्यावेळी नितीनही तेथे आला. लता हिने आत्महत्या केल्याचे त्याने पाहिले. पोलिसांना माहिती कळविण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन कार्यवाही सुरू केली. मृतदेह रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला. पंचनामा आणि इतर कामकाज सुरू होते.

दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच नितीन याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर आत्महत्या करीत असल्याचा स्टेटस काहींनी पाहिला. त्यामुळे गावात लगेच शोधाशोध सुरू झाली. तेव्हा दुपारी तीनच्या सुमारास नितीन याने शेतातील झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे आढळून आले. मग पुन्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी त्याचाही मृतदेह ताब्यात घेतला. पुढील कार्यवाही सुरू आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस अंमलदार संभाजी शेंडे, शशी मस्के, संजय जायभाय यांनी घटनास्थळी येऊन कार्यवाही सुरू केली आहे. दोघांच्या आत्महत्यांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दोन्ही आत्महत्यांचा एकमेकांशी संबंध आहे का? त्याचे कारण काय आहे, याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here