नाशिक (विशेष प्रतिनिधी) : संशयित आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाला येथील लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.
या कारवाईमुळे अंबड पोलीस ठाण्यात खळबळ उडाली आहे. नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई बुधवारी (दि.२४) अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात केली. पोलीस उपनिरीक्षक कैलास आनंदा सोनवणे आणि पोलीस शिपाई दिपक बाळकृष्ण वाणी असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पोलिसांची नावे असून, याप्रकरणी तक्रारदार यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
तक्रारदार यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात ३५३, १४३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात तक्रारदार यांना नाशिक न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून, पोलीस ठाण्यात जामीन प्रक्रिया पूर्ण करुन देण्यासाठी सोनवणे आणि वाणी यांनी तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीत १० हजार रुपये देण्याचे ठरले होते.
तक्रारदार यांनी एसीबीकडे मंगळवारी (दि.२३) तक्रार केल्यानंतर पथकाने पडताळणी करुन सापळा रचला.तक्रारदार यांच्याकडून पोलीस उपनिरीक्षक कैलास सोनवणे व पोलीस शिपाई दिपक वाणी यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या आवारात लाचेची रक्कम स्विकारली. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्विकारल्यानंतर पथकाने दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात बुधवारी दोघांना अटक करण्यात आली आहे.






