मुंबई (हितेश मिस्त्री) – उल्हासनगरातील प्रेस बाजारात असलेल्या लग्नपत्रिका-वेडिंगकार्ड छपाईच्या इमारतीला रविवारी रात्री उशिराने भीषण आग लागली. या भीषण आगीत तळमजला, दुसरा व तिसरा मजला जळून खाक झाला आहे. अग्निशमन व टँकर्स अशा 70 ते 80 गाड्यांनी तब्बल 12 तास पाणी मारून आग आटोक्यात आणली. मात्र दुपार उलटून गेल्यावरही इमारती मधून धूर निघत होता.
रोशन कार्ड ही लग्नपत्रिका-वेडिंगकार्ड छपाईची तीन मजल्याची इमारत छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील प्रेस बाजारामध्ये आहे. त्याचे मालक रमेश उतमामी आहेत. काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास इमारतीत भीषण आग लागली. पालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी जवानांसोबत घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरूप एवढे महाभयंकर होते की सुमारे 70 ते 80 पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने रात्रभर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.







