आता अमेरिकेचे नागरिकत्व नाकारणाऱ्यांची संख्या वाढतेय

वॉशिंग्टन – एकिकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलेलं असतानाच दुसरीकडे अमेरिकेच्या नागरिकत्वास नकार देत त्याचा त्याग करणाऱ्यांची संख्यासुद्धा लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. रविवारीच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
२०२० या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांमध्ये जवळपास ५८०० अमेरिकन नागरिकांनी आतापर्यंत त्यांच्या नागरिकत्वाचा त्याग केला. २०१९ मध्ये जवळपास २०७२ नागरिकांना देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केला होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा नागरिकत्व सोडणाऱ्यांचा आकडा सध्या संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरत असल्याची माहिती बेब्रिज अकाऊंटसने प्रसिद्ध केल्याचं कळत आहे.
बेब्रिज अकाऊंटसच्या माहितीनुसार अमेरिकेच्या सरकारकडून दर तीन महिन्यांयतून देण्यात आलेल्या आकडेवारीवरुन ही माहिती समोर आली आहे. बेब्रिज मध्ये भागीदार असणाऱ्या ऍलिस्टेअर बॅम्ब्रिज यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार हे असे नागरिक आहेत, ज्यांनी देश केव्हाच सोडला असून, आता नागरिकत्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोरोना व्हायरसच्या परिस्थिती हाताळण्याची एकंदर पद्धत, देशातील राजकीय परिस्थिती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रती देशातील वातावरण ही यामागची कारणं ठरत आहेत.
अमेरिकेच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या इच्छुकांना $2,350 इतकी रक्कम भरुन ते अमेरिकेत नसल्यास, अमुक एका देशातील अमेरिकेच्या दुतावासात खुद्द हजर राहावं लागणार आहे. येत्या काळात नागरिकांचा हा निर्णय आणि नागरिकत्त्वाचा त्याग करणाऱ्यांची संख्या वाढणारच आहे, असं या अहवालातून सिद्ध झालं आहे. मुख्य म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा निवड झाल्यास देशाच्या नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार आहे असं वातावरण सध्या अमेरिकेत तयार झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here