४० हजार वीज बिल आल्याने वडीलांनी संपवली जीवनयात्रा; मुलाची पोलिसात तक्रार

नागपूर (मनोज बाचले) – तब्बल ४० हजारांचे वीज बिल आल्यामुळे चिंतेत असल्याने आपल्या वडिलांनी आत्महत्या केली. अशी तक्रार अमित लिलाधर गायधने यांनी नागपुरातील यशोधरा पोलिस ठाण्यात केली आहे. वीज बिल कमी करून मिळण्यासाठी वडील लिलाधर गायधने हे वीज मंडळाच्या कार्यालयात अनेकवेळा गेले होते. मात्र वीज बील कमी करून मिळाले नाही असाही आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
लीलाधर लक्ष्मण गायधने (वय ५६) असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाहुणे ले-आऊटमध्ये राहत होते. ८ ऑगस्ट ला लिलाधर गायधने यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात पोलिसांशी संपर्क साधला असता, दारूच्या नशेत लिलाधर गायधने यांनी स्वतः च्या अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतले असे पोलिस निरीक्षक दिपक साखरे यांनी सांगितले आहे. तर ४० हजाराचे बिल आल्याने वडील सतत चिंतेत राहत होते असे मुलगा अमितने आपल्या जबाबत सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलाच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिस अधिक तपास करीत आहेत. गायधने खासगी काम करायचे. त्यांचे स्वत:चे घर आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना ४० हजार रुपये वीज बिल आले होते. एवढे मोठे बिल आल्यामुळे त्यांनी संबधित अधिकाऱ्यांकडे बिल कमी करून मिळावे म्हणून पाठपुरावा केला. मात्र त्यांना दिलासा मिळाला नाही असे लिलाधर गायधने यांचा मुलगा अमित गायधने यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here