अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील राहता येथे मद्यपी तरूणाने सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत रस्त्याच्या कडेने जाणार्या दुसर्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली व त्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला. अपघाताचा हा प्रसंग पाठीमागे असलेल्या एकाने मोबाइल कॅमेर्यात कैद केला आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल केला.
गेल्या तिन दिवसांपासून मोटारसायकल अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. साकुरी-शिर्डी रस्त्यावर साईदत्त ट्रेडर्स समोर हा अपघात घडला आहे. यात एक मद्यपी तरूण सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असून काही अंतर पुढे गेल्यानंतर एका मोटारसायकला पाठीमागून जोराची धडक देताना दिसत आहे. मोटारसायकलवर शेतमाल घेऊन जाणार्या शेतकर्यास मद्यपी तरूणाने जोराची धडक दिली. शेतकरी मोटार सायकलवरून खाली पडला तर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला पडली होती. सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या माल वाहतुक टेंम्पोवर तो आदळला नाही.अन्यथा शेतकर्यास गंभीर दुखापत झाली असती. या अपघातानंतर मद्यपी बाईकस्वाराने तेथून पळ काढला. दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मद्यपी तरूण कोण? याबाबत चर्चा रंगली आहे.
सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मिडीयावर खेद व्यक्त केला. मद्यधुंद तरूणावर कारवाई करावी, असे संदेशही झळकले. या अपघातानंतर पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. अनेक तरूण मोटारसायकल सुसाट वेगाने चालवतात, कर्कश हॉर्न वाजवत सर्कस करतात. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते. अशा बेफाम झालेल्या वाहन चालकांवर वेळीच कारवाई करणे गरजेचे असून पालकांनी देखील गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होत आहे.






