ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : मुंबई आता पुन्हा एकदा महिला अत्याचाराने हादरली आहे. कुर्ला येथील विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कोहिनुर एचडीआयएल वसाहतीमध्ये वीस वर्षीय तरुणीची बलात्कार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.
कुर्ला येथील एचडीआयएल या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातील इमारती गेली दहा वर्षे बंद पडून आहेत. यापैकी इमारत क्रमांक १६ सी या तेरा मजली इमारतीच्या गच्चीवर असलेल्या लिफ्ट रूममध्ये अज्ञात वीस वर्षीय तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. (दि. २५) रोजी काही स्थानिक मुले व्हिडीओ बनविण्यासाठी या बंद इमारतीमध्ये गेली होती. त्यांना यावेळी तरुणीचा मृतदेह दिसला.
याबाबतची माहिती या मुलांनी स्थानिकांना आणि पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. घटनास्थळी विनोबा भावेनगरमध्ये पोलीस दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी राजावाडी शवविच्छेदन गृहात पाठवला. शवविच्छेदन प्राथमिक अहवालात या महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर तिच्या डोक्यावर आणि अंगावर जखमा दिसून आल्या आहेत. त्यामुळे या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच शनिवार (दि. २७) रोजी मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. सध्या विनोबा भावेनगर पोलीस ठाण्याची पाच पथके, आणि गुन्हे शाखा या मयत मुलीची ओळख पटविणे आणि तिच्या आरोपींचा शोध घेत आहे.






