परळी वैजनाथ मंदिर बॉम्बने उडवून देण्याची पत्राद्वारे धमकी; दोघे ताब्यात

परळी (प्रतिनिधी) : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचव्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैजनाथ मंदिर बॉम्बने उडवून देण्याची पत्राद्वारे मंदिराच्या विश्वस्तांना धमकी देण्यात आली. धमकीच्या प्रकार पोलिसांनी गांभीर्याने घेतला असून याचा कसून तपास सुरू केला. शनिवारी बीड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. श्वानपथकही बोलावण्यात आले होते.

शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असता, टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहात होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. या पत्रात लिहिले होते की, आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाट देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच दिलेल्या पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी माझ्याकडील आरडीएक्सने वैद्यनाथ मंदिर उडवीन, अशी धमकी कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली आहे. या प्रकरणी संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढववण्यात आली आहे.

रतनसिंग रामसिंग दख्खने (रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड) या पत्त्यावरुन हे पत्र आले. हे पत्र पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. पत्रात उल्लेख असलेल्या नावाबाबत पोलिसांनी नांदेड येथे जाऊन दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. एक व्यक्ती विमा प्रतिनिधी असून एकजण बांधकाम व्यावसायिक आहे. दहशतवाद विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली असता आमच्यासोबत खोडसाळपणा केला गेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पुढील दोन दिवसांत आमची कोर्टाची तारीख असून, त्यांच्याशी वाद चालू आहे. त्याच व्यक्तींनी आमच्या नावाचा वापर करून पत्र लिहिले असल्याचा आरोपही ताब्यात घेतलेल्या दोघांनी केला आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांकडून अधिक माहिती घेण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

https://www.facebook.com/DPMunde/posts/3137907263105549

वैजनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे गजाआड दिसतील.कोणीही घाबरून जाऊ नये असे आवाहन, राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी केले आहे. याबाबत फेसबुक पोस्ट करुन ना.धनंजय मुंडे यांनी धमकीच्या पत्राबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here