पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : एस. एम. जोशी पुलाखाली संशयास्पदरित्या थांबलेल्या विनायक किरण पाटोळे (वय १९, रा. जनवाडी) या सराईत चाेरट्याला पकडून डेक्कन पोलिसांनी वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास पथकातील अंमलदार सागर बाबरे व दादासाहेब बर्डे यांना दुचाकी चोरटा एस एम जोशी पुलाखाली थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर व त्यांच्या सहकार्यानी विनायक पाटोळे याला पकडले. त्याच्याकडील दुचाकी ही डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे आढळून आले. पाटोळे याला अटक करुन अधिक तपास करता अलंकार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली आणखी एक दुचाकी त्याच्याकडून जप्त करण्यात आली.
परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे संजय मोगले, तपास पथकातील सहायक निरीक्षक बाबासाहेब झरेकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर शिंदे व त्यांच्या सहकार्यांनी ही कामगिरी केली आहे.






